बँकेचे लॉकर्सधारक आहात? मग जाणून घ्या काय आहेत नवीन नियम २०२३ - New Rules for Bank Lockers 2023
1 जानेवारी 2023 पासून बँकेचे बँक लॉकर साठीचे नियम बदलले आहेत. या नव्या नियमांनुसार, (New Rules for Bank Lockers 2023) लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास आता बँकेला त्याची भरपाई करावी लागणार आहे.
आपल्यापैकी ज्यांच्याकडे बँकेचे लॉकर्स आहेत, त्यांना याबाबत बँकेचा संदेश आला असेलच, ज्यामध्ये, सर्व ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत नव्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठीची सूचना केलेली आहे.
ह्या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे. लॉकर्सधारक बँक ग्राहकांना या नियमाचा मोठा फायदा होणार आहे.
नव्या नियमांनुसार, बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे काही नुकसान झाल्यास बँकेला त्याची भरपाई करावी लागणार आहे.
म्हणजेच, आता नव्या नियमानुसार बँकेची जबाबदारी वाढली आहे व हे नियम अधिक ग्राहक-धार्जिणे झाले आहेत.
त्याखेरीज, बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईही बँकेला करावी लागणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या नव्या नियमांनुसार, (New Rules for Bank Lockers 2023) यापुढे ग्राहकाच्या झालेल्या कोणत्याही नुकसानाची लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट पर्यंत नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.
मात्र, काही विशिष्ट परिस्थितीमुळे झालेले नुकसान भरून देण्यास बँक जबाबदार राहणार नाही, उदाहरणार्थ, वीज पडणे, भूकंप, पूर, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींमुळे लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान झाल्यास अथवा ग्राहकाच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे काही नुकसान झाल्यास बँक त्याला जबाबदार राहणार नाही.