बॅंडवॅगन परिणाम (इफेक्ट) काय आहे?
बॅंडवॅगन इफेक्ट (परिणाम) आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. आपण अनेकदा ह्या परिणामाच्या परिणामांना कळत नकळतपणे बळी पडतो.
एक उदाहरण देतो. तुम्ही नुकतीच वयाची पंचविशी पार केली आहे. मागील काही महिन्यापासून तुमच्या फेसबुक फिडवर अधून मधून तुमच्या लांबच्या मित्रमैत्रिणींनी लग्न केल्याच्या पोस्ट झळकू लागल्या आहेत.
काही महिन्यांनी तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींच्या लग्नाची आमंत्रणे यायला सुरुवात झाली आहेत. त्यातील काहींची लग्न तुम्ही जमेल तशी अटेंड करता. इतरांना फेसबुक, व्हाट्सअपद्वारे शुभेच्छा देता. असे काही महिने, वर्षे उलटल्यावर तुमच्या लक्षात येते कि तुमच्या ओळखीतील बहुतेक सर्व समवयस्क लोकांची लग्ने झाली आहेत. काहींना तर मूल सुद्धा झाली आहेत.
इतके दिवस तुम्ही तुमच्या लग्नाचा विषय शिताफीने टाळण्यात यशस्वी झाला होता. कधी स्वतःला समजावत तर कधी घरातल्या लोकांशी प्रेमाने वाद घालून तुम्ही तुमचं लग्न लांबणीवर टाकलं होत. पण आता मात्र तुम्हाला असं करणे जवळपास अशक्य झाले आहे.
तुमच्या ओळखीतल्या सर्व लोकांची लग्न झाल्यामुळे तुमच्यावर लग्नासाठी सोशल प्रेशर (समाजातून दबाव) यायला सुरुवात झाली आहे. ह्या दबावाला बळी पडून तुम्हाला सरतेशेवटी लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
थोडक्यात, अजाणतेपणी तुम्ही बॅंडवॅगन इफेक्ट अनुभवता आहात.
आपल्या आजूबाजूचे लोक मोठया संख्येने एखादी कल्पना, विचार, स्टाईल, फॅड, ट्रेंड, इ. चे अनुसरण करीत आहेत म्हणून अंधपणे त्याचे अनुसरण करण्याच्या लोकांच्या प्रवृत्तीला बॅंडवॅगन इफेक्ट असे म्हणतात. जस जशी अनुयायांची संख्या वाढत जाते तस तसे अजून कित्येक अनुयायी अनुसरण करायला सुरुवात करतात.
येथे अजून काही बॅंडवॅगन इफेक्टची उदाहरणे देता येतील.
निवडणुकीत जो उमेदवार जिंकण्याची शक्यता खूप जास्त असते त्यालाच मतदार मत देणे पसंद करतात. भले सुरुवातीला त्याला मत देण्याची इच्छा नसली तरी निवडणुकीदरम्यान मतदारांचा एकंदर कल बघून त्यांचे मत बदलते.
सोशल मीडियावर एखादा चॅलेंज जस जसा जोर धरू लागतो तस तसे अनेक लोक तो चॅलेंज पूर्ण करून पोस्ट टाकण्यासाठी तुटून पडतात. अलीकडंच उदाहरण द्यायचं झालं तर लॉकडाऊनदरम्यान कपल चॅलेंज, नथीचा नखरा, केक बनविणे असे अनेक चॅलेंज जोर धरत होते.
सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे फॅशन स्टाईल.
आपण जर चांगल्या लोकांच्या संगतीत असू तर त्यांच्या चांगल्या सवयी आपल्याला लागायला लागतात. जर आपल्या घरातील सर्वाना वाचनाची आवड असेल तर आपसूकच आपल्या मनात त्या बद्दल कुतुहूल निर्माण होते.
अनेक प्रसिद्ध कंपन्या त्यांच्या उत्पादनांचा खप वाढविण्यासाठी बॅंडवॅगन इफेक्टचा कुशलरित्या वापर करतात. प्रसिद्ध नायक / नायिकांना उत्पादनाच्या जाहिरातीत घेण्याचे हेच कारण आहे. आपला आवडता नायक एखादे उत्पादन वापरतो किंवा त्याची जाहिरात करतो म्हणून ते वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागते.
जगप्रसिद्ध ऍपल कंपनीने त्यांची उत्पादने खपविण्यासाठी कळत नकळतपणे ह्या इफेक्टचा वापर केला आहे.
बॅंडवॅगन इफेक्ट काही अंशी हानिकारक पण आहे.
तरुणाईत अनेक लोकांना दारू, गुटखा, इ. चे व्यसन जडण्यात पण बॅंडवॅगन इफेक्टचा हात आहे. आपले मित्र, मित्रांचे मित्र दारू, गुटखा ह्यांचे सेवन करतात म्हणून मजेसाठी त्याचे सेवन करणारे अलगदपणे व्यसनाच्या आहारी सुद्धा जातात.
आपण जर निश्चय केला तर बॅंडवॅगन इफेक्टचा वापर आपण आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी करू शकतो. आपण जास्तीत जास्त चांगल्या माणसांच्या संगतीत राहून त्यांच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्याचा प्रयत्न करू शकतो. तसेच वाईट संगत टाळून वाईट सवयींपासून दूर राहू शकतो.
तुम्हाला जर बॅंडवॅगन इफेक्ट बद्दल चांगल्या पद्धतीने जाणून घ्यायचे असेल तर मी तुम्हाला Rich Dad Poor Dad हे पुस्तक सुचवत आहे. ज्यामध्ये बॅंडवॅगन इफेक्टचा सकारात्मक उपयोग कसा करायचा याबाबदल चांगले मार्गदर्शन केलेले आहे.
तसेच आपल्याला दैनंदिन जीवनात आपले व्यवहार करतांना काही छोट्या मोठ्या फसवणुकीना सामोरे जावे लागते. यासाठी आम्ही एक लेखमालिका चालू करत आहोत. ज्यामध्ये आपल्यासोबत किंवा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घोटाळ्यांची तसेच फसवणुकीची माहिती देण्यात येईल, आणि त्यापासून आपला बचाव कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.
या घोटाळ्यामध्ये आर्थिक, व्यावसायिक, राजकीय, ऑनलाईन, सामाजिक घोटाळे किंवा फसवणुकींबद्दल माहिती देण्यात येईल. रोज नवीन घोटाळ्यांबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकता.